अत्यंत सुंदर कल्पना आणि मांडणी, एखाद्या ज्वलंत विषयाला सर्व बाजूंनी कसा न्याय द्यायचा हे या चित्रपटाने दाखवलं. या चित्रपटाने कोकणच्या समस्या ,फक्त एक प्रदेश निसर्गाचा भाग म्हणून दाखवलेल्या नाहीत तर, बाबुली, माधव, सरपंच,पोलिस या सर्व व्यक्तिरेखांमधून त्या त्या पिढीतील आणि त्या वयाच्या जनतेच्या प्रश्नांना हात घातलाय.
म्हाताऱ्या माणसांची कोकणी संस्कृती, निसर्ग, पंचमहाभूतं या सर्वांविषयी असणारी श्रद्धा, कृतज्ञता आणि सद्य स्थितीत त्यांचा चाललेला ऱ्हास ,त्यामुळे होणारी त्यांची घालमेल तर दुसरीकडे आपल्या पालकांबद्दल तितकीच काळजी असलेली पण मोठी स्वप्न मनात बाळगून राहणारी तरुण पिढी यांच्यातील द्वंद्व सुरवातीला उत्तम रेखाटलं आहे. त्याचबरोबर प्रगतीच्या नावाखाली भस्मासुराप्रमाणे नैसर्गिक संपत्ती लाटू पाहणारे महत्त्वाकांक्षी उद्योजक, पैसा आणि बळाचा वापर करून कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं भीषण वास्तव देखील हा चित्रपट समोर आणतो.
त्याचबरोबर प्रशासनाचा नाकर्तेपणा, महसूल कमावण्यासाठी उद्योजकांपुढे प्रशासन कसं झुकतं याचं देखील एक योग्य प्रतिबिंब चित्रपटात दिसतं. शेवटी चित्रपटाने शाश्वत विकासावरती महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपटाचा शेवट थोडा ' कांतारा ' ह्या चित्रपटात दिलेल्या संदेशाशी मिळता जुळता वाटला. फरक एवढाच की, कांतरा ने जो एकजुटीचा संदेश अव्यक्त स्वरूपात दिला, त्याला इथे जनतेच्या आवाजाच्या निमित्ताने वाचा फोडलेली दिसते.
फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी निर्मात्यांच्या आवर्जून लक्षात आणून द्याव्याशा वाटतात. पहिली म्हणजे चित्रपटाला subtitles आहेत असं सांगून देखील ते काल चित्रपटात दाखवले नव्हते. (हा चित्रपट मी बंगळूरु मध्ये पाहिला)हा संदेश जर खरंच इतका महत्त्वाचा आहे आणि आपली कला, संस्कृती, आपलं कोकण जर कांतारा प्रमाणेच देशभर किंवा जगभर पोहोचवायचं असेल तर production house ने ही जबाबदारी घ्यायला हवी ना? त्याच बरोबर काही व्यक्तिरेखांसाठी निवडलेले कलाकार थोडेसे कमी प्रभावी वाटले. Cinematography च्या दृष्टीने दिलीप प्रभावळकर आणि जंगलातील scenes सोडता पूर्ण गाव आणि तेथील राहणीमान दाखवताना कुठेतरी धुसरता आल्याचं जाणवलं.
पण शेवटी, हा चित्रपट पाहून जगभर चाललेल्या पर्यावरण चळवळींची आठवण झाली आणि ' कोकणी रानमाणसाने ' मांडलेल्या economics of happiness ही संकल्पना ,हा चित्रपट कसा मांडू पाहतोय हे लक्षात आलं. विकासाच्या नावाखाली कोकणातील जंगलतोड हा मुद्दा आहेच पण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तेथील अशी अनेक कातळशिल्प नाहीशी करून खनिजं काढण्याचं काम सुरु आहे.
हा आपल्या धर्म आणि संस्कृतीवर प्रत्यक्ष वार नाहीतर मग अजून काय? असा प्रश्न पडतो.
१५ वर्ष सत्तेत असलेलं हिंदुत्ववादी सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की ,हिंदू धर्म हा केवळ धर्म नसून way of life आहे, एक जिवंत पुरातन संस्कृती आहे. मग प्रश्न पडतो की ,तरुणांना स्वप्न दाखवून, म्हाताऱ्या माणसांना शाश्वत विकासाची अमिषं दाखवून हे सरकार, हे असलेलं निसर्गधन आणि शेकडो वर्षे आधी कोरलेली संस्कृतीची ओळख पुसून कोणाचं स्वप्न साकारतंय? त्यांनी निवडून दिलेल्या जनतेचं, की निवडणुकीला मदत करणाऱ्या उद्योगपतींचं? याकडे कोकणातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने गांभीर्याने बघितलंच पाहिजे.
आमच्या economics मध्ये Marxist philosophy चा खूप मोठा वाटा आहे. तसा एरवी मी त्याचा मोठा समर्थक किंवा चाहता नाही. पण हा चित्रपट पाहून आणि एकंदर कोकणातील परिस्थितीचा विचार करता, रोगन आणि हरमन डेली ने मांडलेली de-growth theory पटायला लागते. ही संकल्पना थोडक्यात असं सांगते की, शाश्वत विकासापेक्षाही कधीतरी विकास थांबवणं पण महत्त्वाचं आहे. आपल्याला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी ,नेमका किती विकास गरजेचा आहे याचं मोजमाप करण्याची वेळ आता आली आहे. नाहीतर अती झालं आणि हसू आलं अशी गत होऊन आपल्या महत्त्वाकांक्षी विकासाला समाधी मिळाल्याशिवाय राहणार नाही.
सरते शेवटी एवढच उमगले की, सरकार, नेते, प्रशासकीय अधिकारी या सर्वांपेक्षा सामान्य माणूस खूप ताकदवान आहे. त्याने त्याचं विश्वरूप योग्य ठिकाणी समाजभान ठेवून दाखवलं तर मोठ्यातील मोठ्ठं प्रस्थ किंवा संस्था यांना नमतं घ्यावच लागतं. त्यामुळे जनतेने या सगळ्या व्यवस्थेपलिकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि हे धर्मयुद्ध स्वतःच लढायला हवं.
वरद सहस्रबुद्धे
१७/०९/२०२५