मागील भागात आपण सोशल मीडियाचा तरुणाई वर असलेला प्रभाव आणि त्याची कारणं बघितली. त्याचबरोबर आपण काही उदाहरणं बघितली ज्यामध्ये या सोशल मीडियाचा विविध क्षेत्रांमध्ये वापर केला जातो.
या भागामध्ये आपण अशाच सोशल मीडियावरील संधी आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.
सोशल मीडिया हे माध्यमच एक जादुई वरदान आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. आजच्या काळात एकही गोष्ट अशी नाही जी आपण सोशल मीडिया व अनेक नेटवर्किंग साईट्स चा वापर करून घरबसल्या करू शकत नाही!
- सोशल मीडियाने जगाला आपलंसं केलं आहे.त्यामुळे आपले विचार, कल्पना जगात कोठेही पोहोचवता येतात. तसच याद्वारे अनेक नवीन व उपयुक्त ओळखी निर्माण होतात.
- सोशल मीडियाने शिक्षण क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आजच्या मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर ज्यांनी या क्षेत्रात एक वेगळीच उंची गाठली आहे त्यांच्या अनुभवाचे बोल मुलांपर्यंत सहज पोहोचू शकतात व त्यामुळे त्यांना करिअर निवडीच्या गोंधळात एक दिशा प्राप्त होते व ते यशस्वी होतात. हे सगळं ज्ञान अगदी माफक दरात म्हणजेच इंटरनेट चा खर्च सोडल्यास अगदी मोफत उपलब्ध होत आहे.
- सोशल मीडिया हा फक्त मुलांसाठीच नव्हे तर ज्येष्ठ किंवा वयोवृद्ध लोकांसाठी देखील तितकाच उपयुक्त आहे. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर लॉकडाऊन च्या काळात बऱ्याच एकट्या राहणाऱ्या वृद्धांना किंवा वृद्ध जोडप्यांना याच सोशल apps मुळे गरजूंपर्यंत किराणा, भाजीपाला, औषधं या गरजेच्या वस्तू वेळेत व सुखरूप पोहोचू शकल्या. अशा परिस्थितीत सोशल मीडिया हा अडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून येणारा सोबतीच म्हणावा लागेल.
- फक्त मदत व माहिती साठीच नव्हे तर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देखील सोशल नेटवर्किंग साईट्स उपयोगी पडतात. याच सोशल साईट्सचा वापर करून व्यवसाय जागतिक पातळीवर नेता येतो. यातला आणखी एक फायदा म्हणजे, यामुळे आपण व्यवसायात नफा तर कमवतोच, पण त्याचबरोबर आपला व्यवसाय अगदी कमी खर्चिक होतो.
- सोशल मीडिया हा विविध NGOs, तसच अनेक सामाजिक संस्थांसाठी देखील एक मदतनीस म्हणून काम करतो. याद्वारे समाजातील गरीब, वंचित लोकांपर्यंत सहज मदत पोहोचू शकते. ती मदत आर्थिक असो वा वस्तू स्वरूपातील, आपण ती घरबसल्या अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे सोशल मीडिया हा “एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!” ही उक्ती खरी करण्यात एक मोलाचा वाटा उचलतो असच म्हणावं लागेल.
- सोशल मीडियाचा आपण प्रबोधनासाठी वापर करून समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर बंधनं आणू शकतो व त्यामुळे त्रस्त असलेल्या अनेक जमातींना आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवू शकतो.
- सोशल मीडियाने सामान्य लोकांचीच नव्हे तर सरकारची देखील तितकीच मदत केली आहे.याच्या मदतीने हेरगिरी करून देशावर होणाऱ्या आकस्मिक व अप्रत्यक्ष आशा cyber हल्ल्याला रोखता येऊ शकते, व शत्रूच्या नापाक इराद्याला आळा घालता येतो.




