Thursday, July 14, 2022

कुठवर साहू घाव शिरी !




सरणार कधी रण प्रभू तरी ; कुठवर साहू घाव शिरी!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातलं आणि थोर कवी कुसमाग्रज यांनी रचलेलं हे गाणं अंगावर शहारे आणणारं असच आहे! स्वामीनिष्ठेचा, त्यागाचा, न्याय हक्कांसाठी लढण्याचा आणि शौर्य, पराक्रमाचा ठसा मनामनात उमटवणारी ती घटना होती. त्या रात्री नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेनी केवळ घोडखिंड पावन केली नाही, तर ज्या ज्या मनात स्वराज्याच्या अस्तित्वाबाबत, त्यातील मावळ्यांच्या धैर्याबाबत, महाराजांच्या युक्तीबाबत शंका होती, ती देखील दूर करून पवित्र केली.

आज जेव्हा महाराष्ट्रात जवळ जवळ सगळीकडे रेड अलर्ट घोषित केला आहे. मोठ्या प्रमाणमध्ये गावांचा संपर्क तुटला आहे, रस्ते बंद आहेत. अशावेळी कोणतेही पक्के रस्ते नसताना डोंगर दरीतून वाट काढत झुंजणाऱ्या या शुरांचा खरंच हेवा वाटतो. या परिस्थितीत देखील त्यांनी युद्धं कशी जिंकली असतील आणि लढा कसा दिला असेल ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.

 अर्थात यात अनेक घटक आहेत. सर्वप्रथम स्वामीनिष्ठा आणि सवंगड्यांवर असणारा प्रचंड विश्वास, त्याच बरोबर एकच लक्ष्य ते म्हणजे स्वराज्य आणि जनसामान्यांची सुरक्षा आणि प्रगती कारण केवळ स्वराज्य असून चालत नाही ते चालवायला सुराज्य ही असावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जनतेला जागृत करणं व त्यांच्या न्याय हक्कांसाठी आत्मनिर्भर होण्यास मदत करणं हा ही एक प्रमुख अट्टाहास होता.

आज बाजीप्रभू आणि बांदल सेनेला तोंड द्यावं लागलं तशी परिस्थिती नसेल कदाचित पण आज असे अनेक  सामाजिक आणि वैयक्तिक प्रश्न आहेत, जे आपल्या सर्वांना भेडसावतात मग ती समाजातली कटुता असो वा बाहेर सतत बदलणारी राजकीय परिस्थिती आणि त्यात घेतलेल्या महत्त्वाकांक्षी निर्णयांमुळे होणारा त्रास. किंवा वैयक्तिक पातळीवर शिक्षणाची चांगली संधी इतरांच्या अपेक्षा चांगल्या नोकरी किंवा व्यवसायाची शाश्वती अशा अनेक प्रश्नांनी विचारात पडायला होतं आणि सध्या महामारी नंतर रोज येणारे अनिश्चिततेचे वार बघून हेच म्हणावसं वाटतं की “कुठवर साहू घाव शिरी!!!”

पण ज्या वेळी महाराजांनी विशाळगड गाठला, त्यावेळी मिळालेल्या मुक्ततेमधून जणू बाजीप्रभूंचा पुनर्जन्म झाला आणि ते लाखोंचे प्रेरणा स्थान म्हणून सदैव जिवंत राहिले. त्याच प्रमाणे अगदी प्राणांची आहुती द्यायची वेळ आली नाही, तरी या संकटांमधून सुटका ही नक्की होईल आणि एक ना एक दिवस यश हाती येईल  तेव्हा आयुष्याला मिळणारा पुनर्जन्म हा कैक पटीने सुखावह असेल. पण यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे हे कष्ट केवळ आत्मप्रगतीसाठी नसावेत, तर ते सर्वप्रथम राष्ट्राच्या प्रगती साठी व समाजकल्याणााठी असावेत आणि त्यातून होत जाणारा विकास म्हणजेच आत्मप्रगती समजावी. आज वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर होणारी अशी अनेक अदृश्य आक्रमणे आपण एकीने आणि नेटाने थोपवून धरली, तर राष्ट्र सर्वोच्च स्थानी पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यायाने एक चांगला समाज आणि व्यक्ती या राष्ट्रात घडतील, हीच आजच्या दिवशी हसत हसत रणी प्राण अर्पण करणाऱ्या या वीरांना आणि त्यांनी आपल्यासमोर कृतीतून ठेवलेल्या या अदर्शांना खरी आदरांजली....

हर हर महादेव! जय हिंद!

दशावतार